राष्ट्रसंत तुकडोजी महाराज | Rashtrasant Tukadoji Maharaj
मिळोनी करावी ग्रामसफाई। नाली, मोरी ठायी ठायी ॥
हस्ते परहस्ते साफ सर्वही । चहूकडे मार्ग । राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
• जन्म : २९ एप्रिल १९०९
• निधन : १० नोव्हेंबर १९६८
• जन्मस्थळ : यावली, जि. अमरावती
शिक्षण: इयत्ता ३ री (मराठी)
• मूळ नाव :( Manik Bandoji Ingle )माणिक बंडोजी इंगळे (ठाकूर)
• आई : मंजुळाबाई
• कार्य : अंधश्रद्धा निर्मुलन, जातिभेद निर्मूलन, महिला उद्धार, राष्ट्रनिर्माण.
अध्यात्मिक गुरु : आडकुजी महाराज 'तुकडोजी' हे नाव गुरु आडकुजी यांच्याकडून मिळाले.
जीवन :
एप्रिल १९०९ मध्ये विदर्भातील यावली येथे बंडोजी व मंजुळाबाई या दांपत्याच्या पोटी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला.
पंढरपूरचा विठोबा हे ठाकूर तथा इंगळे घराण्याचे कुलदैवत. त्यामुळे बालपणीच छोट्या माणिक यास विठ्ठलभक्तीत रस निर्माण झाला व तो विठ्ठलाच्या ध्यान व भजन-पुजनात मग्न राहू लागला.
तुकोबांच्या गाथेतील अभंग माणिकला मुखोद्गत होते. • वरखेड (जि. अमरावती) येथे आजोळी राहत असताना छोट्या माणिकवर आडकुजी (आडकोजी) महाराजांचा प्रभाव पडला व त्यांनी आडकुजी गुरू बनवले.
तुकडोजी हे नाव कसे मिळाले?
माणिकजी सतत तुकोबांचे अभंग गाताना 'तुका म्हणे' असे म्हणत असत. पुढे भजन किर्तनासाठी ते स्वतःच अभंग, कवने रचू लागले..
एके दिवशी त्यांचे गुरु आडकुजी यांनी माणिकजींना 'तुकड्या' म्हणून हाक मारली. आडकुजी यांनी माणिकजींना 'तुका म्हणे' असे म्हणत बसण्यापेक्षा 'तुकड्या म्हणे' असे म्हणत जाण्याविषयी उपदेश केला.
तेव्हापासून माणिकजींनी तुकडोजी हे नाव स्वीकारले व ते 'तुकडोजी महाराज' या नावानेच प्रसिद्ध झाले. तुकडोजी महाराजांचे समाजसुधारणेत योगदान : अंधश्रद्धा निर्मुलन, जातिभेद निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्ती, ग्रामस्वच्छता,
महिलांची उन्नती हे तुकडोजी महाराजांनी आपले जीवितकार्य मानले व आयुष्यभर या कार्याचा हिरिरीने पुरस्कार केला.
(अ) किर्तने व खंजिरी भजनांच्या माध्यमातून जनजागृती : तुकडोजी महाराजांनी देशभर भ्रमण करून किर्तने व खंजिरी भजनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करताना अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन या बाबींना विशेष उत्तेजन दिले.सर्व जाती-धर्माचे, पंथांचे लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले.
ब) ग्रामोन्नती व ग्रामकल्याण : ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा तुकडोजींच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. ग्रामविकासाच्या समस्यांचा त्यांनी मूलभूतस्वरुपी विचार केला व त्यावर त्यांनी अनेक उपाययोजना सुचविल्या त्या आजही उपकारक ठरतात.
'ग्रामगीता' या अजरामर ग्रंथात त्यांनी ग्रामोन्नतीचे अनेक उपाय सांगितले आहेत.
ग्रामगीतेत ग्रामोन्नतेविषयी तुकडोजींनी पुढील विचार मांडले आहेत :
ग्राम हे सुशिक्षित व सुसंस्कृत व्हावे • ग्रामोद्योग संपन्न व्हावेत • गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात. • प्रचारकांच्या रुपाने गावाला नेतृत्व मिळावे. • देवभोळेपणा, जुन्या अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात.
क) सर्वधर्म समभाव : सर्वधर्म समभाव हे तुकडोजी महाराजांचे समाजसुधारणांचे एक क्षेत्र होते. सामुदायिक, सर्वधर्मीय प्रार्थनेचा त्यांनी प्राधान्याने पुरस्कार केला.
'या भारतात बंधुभाव नित्य वसू दे' यासारख्या त्यांच्या गीतांतून सर्वधर्मसमभाव स्पष्ट होतो. विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करताना धर्मातील अनावश्यक कर्मकांडास त्यांनी फाटा दिला.
ड) गुरुकुंज आश्रम: १९३५ साली तुकडोजींनी मोझरी (ता. तिवसा, जि. अमरावती) येथे गुरुकुंज आश्रम स्थापन केला. • गावोगावी गुरुकुंज आश्रमाच्या शाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली.
गावोगावी 'गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली.
इ) साधु संघटना: १९५६ साली अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधु संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे पहिले अध्यक्ष तुकडोजी महाराज हेच होते.
ई) महिलांची उन्नती : कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था व राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर अवलंबून असते, त्यामुळे स्त्रियांना दास्यात व अज्ञानात ठेवणे अन्यायकारक आहे असे विचार त्यांनी परखडपणे मांडले.
तरुणांसाठी कार्य : तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असल्याने ते बलोपासक बनले तरचे ते समाज व राष्ट्राचे रक्षण करतील हा विचार तुकडोजींनी मांडला. • व्यसनाधीनतेचा त्यांनी तीव्र निषेध केला.
'आदेश रचना' या ग्रंथात त्यांनी व्यायामाचे बलोपासनेचे महत्त्व विषद केले.
युवकांनी नीतिमान व संस्कृत बनावे यासाठी त्यांनी अखंड उपदेश केला.
स्वातंत्र्य संग्रामात सहभाग :
खंजिरी भजने, किर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या तुकडोजी
महाराजांनी स्वातंत्र्य लढ्यात देखील सक्रीय सहभाग घेतला. • १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत तसेच १९४२ च्या 'छोडो भारत' चळवळीत त्यांचा सहभाग लक्षणीय होता.
सविनय कायदेभंगाच्या काळात त्यांचा महात्मा गांधीजींशी स्नेह जुळला.
१९३६ साली डॉ. राजेंद्र प्रसाद, पं. जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, गुलझारीलाल नंदा या नेत्यांशी त्यांचा परिचय झाला..
गुलझारीलाल नंदा यांच्यासोबत त्यांनी भारत सेवक समाजात कार्य केले.
१९४२ च्या आंदोलनात 'आते है नाथ हमारे' हे तुकडोजी महाराजांनी रचलेले गीत स्फुर्तिगान ठरले.
१९४२ च्या आंदोलनात आष्टी व चिमूर येथील जनतेस 'चलेजाव आंदोलनाची चिथावणी' दिल्याच्या आरोपावरून तुकडोजी महाराजांना तुरुंगवास भोगावा लागला.
तुरुंगात असतानाच त्यांनी 'सुविचार स्मरणी' हा ग्रंथ लिहिला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी भूदान, अस्पृश्योद्धार, जातिनिर्मूलन या बाबींना विशेष प्राधान्य दिले.
परदेशात विचारांचा प्रसार :
१९५५ साली जपानमध्ये विश्वधर्म व विश्वशांती परिषद संपन्न झाली. या परिषदेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उपस्थित होते.
या परिषदेत त्यांनी सादर केलेल्या भजनाने अनेक पाश्चात्य व पौर्वात्य विद्वान प्रभावित झाले. • १९६६ साली त्यांनी प्रयाग येथे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
राष्ट्रसंत ही पदवी : तुकडोजी महाराजांनी एकदा दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात खंजिरी भजन सादर केले. • या भजनाने प्रभावित होऊन भारताचे तत्कालीन (पहिले) राष्ट्रपती यांनी तुकडोजी महाराजांना 'राष्ट्रसंत' ही पदवी दिली.
ग्रंथसंपदा : हिंदी-मराठी अशा दोन्ही भाषांत तुकडोजींनी काव्यरचना केली. त्यांचे ४० हून अधिक ग्रंथ प्रसिद्ध. ग्रामगीता, आदेश रचना, सुविचार स्मरणी हे त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत.
ग्रामगीता : ४१ अध्याय, ४६७५ ओव्या. • ग्रामगीता ही ग्रामविकासाची संहिता मानली जाते.
आदेश रचना: यामध्ये व्यायामाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे.
• संत तुकडोजी महाराज यांचे प्रमुख अभंग, कविता, भजने : महाराजांचे 'खंजिरी' भजन प्रसिद्ध आहे.
ग्रामगीता
२) तुकडोजींची कविता : राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली । ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ।।
३) जपान येथील विश्वधर्म परिषदेत तुकडोजींनी पुढील भजन सादर केले हर देश में तू, हर भेष में तू। तेरे नाम अनेक तू एकही है।
निधन : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या निधनाच्या तारखेबाबत देखील निश्चित नोंद आढळत नाही.
विश्वकोषात ही तारीख १० नोव्हेंबर १९६८ अशी आहे. तर अनेक ग्रंथात ही तारीख ३१ ऑक्टोबर १९६८ अशी आढळते. गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे या महान राष्ट्रसंताचे निधन झाले.
मोझरी येथेच त्यांची समाधी आहे.